आम्ही त्यावेळेस तिसरीला होतो , आमच्या कॉलनीच्या जवळच होती आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक आणि केंद्र शाळा कोडोली हे माझ्या शाळेचे नाव. घराजवळ शाळा असल्याने मी काय कॉलनीतील , धनगरवाडीतील विद्यार्थी डबा आणायचे नाहीत. २ वाजता जेवायला सुट्टी व्हायची मग सुट्टी झाली आम्ही सरळ घरी जेवायला. जेवायला शाळा सुटली कि एकदम मस्त चित्र दिसे , काही काही पोरांना संडासला लागलेली असायची ती जरा जोरात सुटायची घरी, वर्गातील चांगल्या जी चांगल्या घरातील मुले होती ती गुपचूप घरी जायची, माझा एक मित्र होता त्यावेळेस अमोल म्हणून आय मीन अजूनही आहे, अमोल हा आमच्याच कॉलनीत राहायचा. माझ्याच वर्गात होता. मी आणि अमोल मात्र पूर्ण रस्त्यावर मस्ती करत घरी जायचो , अमोल जर जास्तच खोडील होता , पोरीना चिडव हिला काय बोल तिला काय बोल असले धंधे करायचा पण त्याचात अश्लीलता नव्हती , ना कुठल्या मुलीला दुखवायचा विचार होती ती निक्खळ चेष्टा.
माझी आई त्यावेळेस देगाव फाट्यावरच्या हॉटेल मधी होती कामाला , ती रात्री येताना हॉटेल मध्ये शिल्लक राहिलेले पुरी , वडा , कांदा भजी इत्यादी घेऊन यायची , दुनियेच्या नजरेने आम्ही कितीही गरीब असलो तरी मला कधी आम्ही गरीब आहे वाटायचा नाही, मी कायम खुश असायचो कारण वर्गात दर शनिवारी सगळ्या शिक्षिका बाहेरून भजीपाव , पुरीभाजी मागवून खायच्या त्यावेळेस आमच्या वर्गातील श्रीमंत घरची पोरे त्या वडापाव , भजीपाव कडे लाळ गाळत बघत बसायचे . मला तर हे घरी दररोज भेटायचे म्हणून मी स्वताला कधी गरीब मानतच नव्हतो . असो
गोष्ट अशी आहे कि मी दुपारी जेवण झाला कि शाळेपर्यंत जातोपर्यंत कायतरी टाईमपास म्हणून पुऱ्या, कांदाभजी, वडा इत्यादी घेऊन जायचो आणि रस्त्याने खात जायचो. येताना मी आणि अमोल सोबत असायचो पण जाताना नसायचो तो जरा उशिरा यायचा. मी आपला माझ्याच धुंदीत खिशातून थोडा थोडा बाहेर काढून खात खात शाळेत जायचो. एकदा असाच दुपारचे जेवण करून मी शाळेत चाललो होतो , चड्डीच्या खिशात चांगल्या ७ पुऱ्या नीट घुसवून भरल्या होत्या.
मला रस्त्यातच अमोल भेटला , मग आम्ही दोघेजण निघालो डुलत डुलत मी आपला माझ्याच नादात खिश्यातून एकेक पुरी खात खात चाललो होतो, पहिली पुरी काढली , अमोल ला वाटले मी त्यालाच द्यायला काढली पण तेंव्हा कुठे असले ज्ञान मला , त्याने पुरी बघताच बोलायचं थांबला आणि माझ्याकडे बघू लागला , मला काय माहित ह्याला पुरी पाहिजे , मी आपली तशीच आख्खी पुरी तोंडात टाकली , परत दुसरीला पण तसाच झाला असा करत करत मी शेवटच्या पुरीला आलो, आणि शेवटची पुरी खिश्यातून काढली आणि तोंडात टाकणार तेवढ्यात अमोल मला म्हनला "लका कांबळे मला दिकी पुरी ,मला पुऱ्या लय आवडत्यात मघपसन बघातुया एकटाच खातुया व्हय" मी त्याला ती पुरी देऊन टाकली. च्यायला मी म्हणलो लका आधी का नाही सांगितला तीन तरी पुऱ्या दिल्या असत्या , तो म्हनला मला वाटला तूच देशिल स्वताहून " आता स्वताहून द्यायची अक्कल असती तर दिल्या असत्या किनाई"
त्यानंतर माझ्या मनावर कायमचा बिंबला गेला कि आपण काही खात असेल आणि जर सोबत कोण असला तर ते वाटून घ्यायचा , थोडा हिस्सा त्यालापण द्यायचा. हि चांगली सवय मला लागली पण खिश्यातून पुऱ्या न्हायची सवय काय लौकर नाही सुटली .
भेटू परत पुढच्या वेळी ते पण दुसऱ्या मित्राची कथा " अनिकेत आणि ऑफ पिरिअड"
Mess madhe asach sweet ani tea suddha share karat hotas.Still waiting for Aniket and off period
ReplyDelete